शिरूरच्या गुजरमळा परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस: सहा वर्षाच्या बालकासह १७ जणांना चावा; संतप्त महिलांचा नगरपरिषदेवर संताप, त्वरीत उपाययोजनेची मागणी...!



पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे 

शिरूर शहरातील गुजरमळा परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी दहशत माजवली असून, अवघ्या सहा वर्षाच्या ईशांत राजेंद्र दारोळे या बालकासह एकूण १७ नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, स्थानिक महिला आणि रहिवाशांनी एकत्र येत शिरूर नगरपरिषदेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास अधिक गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.

दिनांक २५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास ईशांत राजेंद्र दारोळे हा आपल्या घराबाहेर खेळत असताना दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला करत चावा घेतला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक महिलांनी एकत्र येत जोरदार आंदोलना केलं. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या सविता दारोळे, स्वच्छता विभागाचे माजी सभापती विठ्ठलराव पवार, सविता वाबळे, संध्या दारोळे, सविता बोरुडे, छाया यादव, धनश्री मच्छिंद्र कदम, नंदा नवले, राजश्री रोकडे, सिंधू पळसकर, पूजा हरिहर, प्रीती बनसोडे, पूजा भोंडवे, सुप्रिया गावडे, रश्मी जगदाळे, नितीन यादव, आशिष पळसकर, दत्तात्रय शेलार, महेश कुरंदळे, महेश पठारे, सुहास वाबळे आदी नागरिक उपस्थित होते.

संतप्त महिलांची व्यथा:

सामाजिक कार्यकर्त्या सविता दारोळे म्हणाल्या, “माझा भाचा ईशांत घराबाहेर खेळत असताना दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी त्याला चावा घेतला. अशा प्रकारे एखादा मोठा अपघात होईपर्यंत नगर परिषद वाट पाहते का?”स्थानिक रहिवासी सविता वाबळे म्हणाल्या, “माझ्याही मुलाला कुत्र्याने चावा घेतला होता. सध्या घराबाहेर खेळणेही धोक्याचं झालं आहे.”

सविता भोंडवे यांनीही तशाच स्वरात व्यथा मांडली, “वारंवार कुत्र्यांकडून लहान मुलांना आणि ज्येष्ठांना त्रास होत आहे. पालिकेने तातडीने कारवाई करावी.”

पवार यांचा इशारा:

शिरूर नगर परिषदेचे माजी सभापती विठ्ठलराव पवार यांनी गंभीर इशारा देत सांगितले, “गेल्या काही दिवसांत गुजर कॉलनी परिसरात काळ्या व पांढऱ्या रंगाच्या दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी १७ जणांना चावा घेतला आहे. एखाद्याचा जीव गेला तर जबाबदारी प्रशासनाची असेल.”

जखमींची यादी हादरवणारी:

गुजर कॉलनीतील देवांश पळसकर (वय - ६) या चिमुकल्याला दोन वर्षांत तब्बल तीन वेळा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तसेच श्रेयस पोटे, महादेव चव्हाण, शंभूराजे शेलार, वंश वाबळे, ईशा रावडे, संदेश भोंडवे, मयूरेश कदम, आयुष हरिहर, ८० वर्षीय दरेकर आजोबा, गौरव गिरमकर यांनाही गेल्या काही दिवसांत कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती विठ्ठलराव पवार यांनी दिली.


पालिकेची प्रतिक्रिया आणि कारवाईची आश्वासने:

या पार्श्वभूमीवर शिरूर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “मागील दोन वर्षांपासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण सुरु आहे. गुजर कॉलनीतील दोन मोकाट कुत्र्यांना पकडण्याचे प्रयत्न वारंवार झाले आहेत, मात्र ती कुत्री आत्तापर्यंत सापडलेली नाहीत. या घटनेबाबत मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना अहवाल सादर करण्यात येणार असून तातडीने कारवाई केली जाईल.”

गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सातत्याने होत आहे. आता मात्र संतप्त जनतेचा संयम सुटू लागला आहे. स्थानिकांच्या जिविताला धोका निर्माण करणाऱ्या या मोकाट कुत्र्यांवर कठोर उपाययोजना न झाल्यास, नागरिकांचा रोष अधिक तीव्र होणार हे निश्चित.

नगरपरिषद प्रशासनाने आता तरी जागं व्हावं आणि लहान मुलांचे, ज्येष्ठ नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी ठोस, प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा संपूर्ण शिरूरकरांनी व्यक्त केली आहे.



No comments:

Post a Comment