न्हावऱ्यातील बेकायदा खत कारखान्यावर छापा; नऊ लाखांचा साठा जप्त..!



शिरूर (दि. २८ मे) –

न्हावरे (ता. शिरूर) येथील ‘वेताळ केमिकल्स प्रा. लि.’ या खते तयार करणाऱ्या कंपनीवर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने काल (ता. २७) सायंकाळी उशिरा अचानक छापा टाकत बेकायदेशीर खतसाठा जप्त केला. या कारवाईत तब्बल नऊ लाख ७८ हजार ३०० रुपये किमतीचा विविध खतांचा साठा हस्तगत करण्यात आला असून, कंपनीचे मालक आणि व्यवस्थापकाविरोधात शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


खतनिरीक्षक धनंजय पाटील यांची कारवाई...


जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा खत निरीक्षक धनंजय दिनकरराव पाटील** हे शिरूर तालुक्यातील खते, बियाणे आणि कृषी निविष्ठांचे निरीक्षण करण्यासाठी आले असता, न्हावरे-गुनाट रस्त्यावर वसलेला 'वेताळ केमिकल्स प्रा. लि.' हा कारखाना त्यांना आढळून आला. त्यांनी कारखान्याची तपासणी केली असता, परवान्यात नमूद नसलेल्या अन्य कंपन्यांची खते तयार केली जात असून ती पिशव्यांमध्ये भरली जात असल्याचे निदर्शनास आले.


 पंचनामा व अधिकाऱ्यांची उपस्थिती...


त्यानंतर पाटील यांनी शिरूर पंचायत समितीचे खत निरीक्षक दिनेश अडसुळ, कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ आणि तंत्र अधिकारी डॉ. प्रवीण कदम यांना घटनास्थळी बोलावले. दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. तपासणी दरम्यान खालील खतसाठा आढळून आला:


अमोनियम सल्फेट (४० किलो वजनाच्या) ९१७ बॅगा– अंदाजित किंमत: ₹ ८,७१,१५०

मॅग्नेशिअम सल्फेट (२५ किलो वजनाच्या) ११ बॅगा – अंदाजित किंमत: ₹ ७,१५०


एकूण साठ्याची किंमत: ₹ ८,७८,३००


 दोघांवर गुन्हा दाखल...

याप्रकरणी धनंजय पाटील यांच्या फिर्यादीवरून, कंपनीचे मालक संतोष दिनकर वेताळ व उत्पादन व्यवस्थापक महेंद्र गणपत शेलार (दोघेही रा. न्हावरे) यांच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस आणि कृषी विभागाचे अधिकारी करत आहेत.


बेकायदा खत विक्रीला लगाम...


या कारवाईमुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बेकायदेशीर खत उत्पादकांना चाप बसण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने अशा कारखान्यांवर अधिक कठोर नजर ठेवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

No comments:

Post a Comment