तटकरे यांच्यावरील टीकेवरून महायुतीत खडाजंगी; राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदे गटाला इशारा'
समीर बनकर यांचा रामदास कदम, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर शिवसेना (शिंदे गट) पक्षातील काही नेत्यांकडून होत असलेल्या टीकेचे पडसाद आता महायुतीच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. रामदास कदम, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हसळा तालुकाध्यक्ष समीर बनकर यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवत पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिले. महायुतीत राहून सत्तेचे फायदे घ्यायचे आणि त्याच युतीतील प्रमुख नेत्यांविरोधात बेताल वक्तव्ये करायची, ही भूमिका अयोग्य असल्याचे सांगत बनकर यांनी संबंधित नेत्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला.
यावेळी बोलताना समीर बनकर म्हणाले की, खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात आजपर्यंत इतक्या खालच्या दर्जाची टीका करण्याचे धाडस संबंधित नेत्यांना कसे होते, याचे आश्चर्य वाटते. अशा बेताल वक्तव्ये करणाऱ्यांची कीव येते. महायुतीमध्ये राहायचे, सत्तेचे फायदे घ्यायचे आणि त्याच महायुतीतील प्रमुख नेत्यांविरोधात उलटसुलट वक्तव्ये करायची, ही बाब संबंधित नेत्यांवर झालेल्या संस्कारांचे दर्शन घडवते, अशी टीका त्यांनी केली.
रामदास कदम, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांना उद्देशून बनकर यांनी, "तुम्ही उद्धव ठाकरे यांचे होऊ शकला नाहीत, तर इतरांना निष्ठा काय शिकवणार?" असा सवाल उपस्थित केला. निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांनी प्रथम स्वतःच्या राजकीय भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे, असेही त्यांनी सुनावले.
दरम्यान, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही चिपळूण येथील सभेनंतर रायगडमधील संबंधित आमदारांना त्यांच्या वक्तव्यांबाबत समज दिल्याचे बनकर यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. तरीही खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात अशाच प्रकारे टीकेची गरळ ओकली जात राहिली, तर संबंधितांना त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला पंचायत समिती सभापती बबन मनवे, नगराध्यक्ष सुनील शेडगे, माजी नगराध्यक्ष संजय कर्णिक,अनिकेत पानसरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनील तटकरे यांच्यावरील टीकेच्या निमित्ताने महायुतीतील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेला हा वाद आगामी काळात कोणते राजकीय वळण घेतो, याकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment