'वन्यजीव सप्ताहानिमित्त बनोटी शाळेत जनजागृती



फोटो -वन्यजीव सप्ताहनिमित्त रा. जि. प. शाळा बनोटी येथे विविध उपक्रम संपन्न झाले त्यानिमित्ताने काढलेल्या रॅलीत सहभागी विद्यार्थी


  (वैभव कळस )

चित्रकला स्पर्धेत जुई कांबळे प्रथम;विद्यार्थ्यांना वनसंवर्धनाचा संदेश

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनोटी येथे वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त वनविभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रोहा वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी स्वप्नील चंबुले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीवर्धन नगरपरिषदेचे नगरसेवक तथा शिक्षण सभापती आणि सेवानिवृत्त वनपाल बाळकृष्ण गोरनाक होते.

यावेळी वनपाल वैभव शिंदे, दिलीप वाघे,वनरक्षक अतुल अहिरे, सागर घुबे,लक्ष्मण राठोड  अनिल टिंगरे यांच्यासह ग्रामस्थ मंडळांचे पदाधिकारी, पालक,महिला मंडळांच्या प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.वन्यजीव सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.यात जुई विश्वास कांबळे हिने प्रथम,श्रेया कांबळे हिने द्वितीय तर प्रज्ञा कांबळे हिने तृतीय क्रमांक मिळविला.

विजेत्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी बाळकृष्ण गोरनाक यांनी विद्यार्थ्यांना ५०१ रुपयांचे रोख बक्षीस दिले.वनांचे महत्त्व,वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान,शेतीचे नुकसान झाल्यास मिळणारी शासनाची नुकसानभरपाई तसेच वनविभागाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना देण्यात आली.म्हसळा तालुक्यातील घोणसे येथे नुकत्याच मगरीच्या संचाराच्या घटनेचा संदर्भ देत वन्यजीवांबाबत सतर्कता व सुरक्षिततेचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले.“वृक्ष आमचे मित्र, तयांना तोडू नका कोणी”या कृतीयुक्त गीतातून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.वनपाल वैभव शिंदे व बाळकृष्ण गोरनाक यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाचा समतोल राखण्याचे महत्त्व पटवून दिले.

तसेच आगामी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सहभाग वाढवून वनविभागामार्फत महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.बनोटी,रेवली व गणेशनगर वन समित्यांच्या कार्याची माहिती समिती पदाधिकाऱ्यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक जयसिंग बेटकर यांनी केले तर आभार गायकवाड यांनी मानले.



No comments:

Post a Comment