चळवळींच्या आंदोलनाचा महाराष्ट्र
(वैभव कळस)
महाराष्ट्र म्हणजे काय? सह्याद्रीच्या पर्वतरांगा, स्वर्गाहून सुंदर समुद्रकिनारे आणि संतांची भूमी याच्या पलीकडेही महाराष्ट्र म्हणजे अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या आंदोलनाच्या चळवळीची भूमी.महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. अशा राष्ट्राला अधिकृतरित्या दर्जा देण्यासाठी देखील महाराष्ट्रातील लढवय्यांना मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी आंदोलन करावे लागले.आंदोलन / चळवळी हा महाराष्ट्राचा पुरोगामी इतिहास आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आंदोलन झाले, तेव्हा तेव्हा ते महाराष्ट्राच्या हितासाठी आणि भविष्यासाठी वरदान ठरले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावरील वाढत्या जुलूमशाहीविरुद्ध स्वराज्यासाठी, रयतेसाठी, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी बंड पुकारून आंदोलनाला सुरुवात केली आणि स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्र आबाद राखला.महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली आणि स्त्री शिक्षणाचा अमूल्य दागिना महाराष्ट्रासमवेत संपूर्ण देशाला बहाल केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेसाठी चळवळ उभी केली आणि महाराष्ट्रासमवेत संपूर्ण देशाला संविधान नावाचे अमूल्य आभूषण दिले.मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी १०८ हुतात्म्यांनी बलिदान दिले. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, एस.एम. जोशी, आचार्य प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट अशा अनेक नेत्यांनी आणि शाहिरांनी महाराष्ट्राच्या भोळ्या-भाबड्या जनतेसाठी, त्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आंदोलने केली. या साहसी चळवळीमुळेच महाराष्ट्राला एक वेगळीच ओळख जगासमोर निर्माण झाली.
आणि आजचा महाराष्ट्र बघितला तर प्रत्येक प्रश्नासाठी आंदोलन उभे राहते. शिवकालीन लढ्यापासून, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते आजच्या विद्यार्थी आंदोलनापर्यंत ही परंपरा चालूच आहे.आजचा विद्यार्थी हा केवळ पुस्तकातला नाही, तर तो प्रश्न विचारणारा आहे. पूर्वी आंदोलने तलवारीने व्हायची, आज ती वह्या-पुस्तकांनी आणि घोषणांनी होतात.
आज महाराष्ट्रात विद्यार्थी का रस्त्यावर उतरतो?
१. शिक्षणाच्या हक्कासाठी: वाढती फी-वाढ, महागडे शिक्षण, शिष्यवृत्ती वेळेवर न मिळणे. गरीब घरच्या मुलाला शिक्षण घेता यावे यासाठी विद्यार्थी आंदोलन करतो. कारण त्याला माहिती आहे, महात्मा फुले यांनी जसे शिक्षणासाठी दार उघडले, तसे ते बंद होता कामा नये.
२. नोकरी आणि भविष्यासाठी: पेपरफुटी, MPSC / UPSC च्या जागा न निघणे, कंत्राटी भरती. विद्यार्थ्याला वाटते आपले भविष्य अंधारात आहे, म्हणून तो मंत्रालयासमोर, विद्यापीठासमोर ठिय्या देतो.
३. आरक्षण आणि समान संधीसाठी: मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या लढ्यात सगळ्यात पुढे विद्यार्थीच असतो. कारण त्याला आपल्या पुढच्या पिढीची चिंता आहे.
विद्यार्थी आंदोलन ही या महाराष्ट्राची सगळ्यात प्रामाणिक चळवळ आहे. यात कुठलाही स्वार्थ नसतो. यात फक्त एकच मागणी असते - आम्हाला शिकू द्या आणि जगू द्या.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी तलवार उचलली, आजच्या विद्यार्थ्याने त्याच स्वराज्याला टिकवण्यासाठी पेन उचलला आहे. हीच खरी महाराष्ट्र धर्माची ताकद आहे.म्हणूनच म्हणावे लागेल, जोपर्यंत महाराष्ट्रात अन्याय असेल, तोपर्यंत इथे आंदोलन पेटतच राहणार. आणि जोपर्यंत इथे विद्यार्थी जागा आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा पुरोगामी विचार कधीच मरणार नाही.

No comments:
Post a Comment