तत्कालीन आमदारांनी मंजूर करवून आणलेल्या खापरदरी सावरगांव कान्होबा रस्त्याच्या रखडलेल्या कामाला प्रारंभ कधी होणार ?

 



खापरदरी पंचक्रोशीतील नागरिकांना अनेक वर्षांपासून पडतोय प्रश्न.


 (प्रती.जगदीश राठोड)  

 मानोरा :– तालुक्यातील खापरदरी या गावातून सावरगांव या चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या तीर्थक्षेत्राला व मंगरूळनाथ या शहराला जोडणाऱ्या मधल्या महत्त्वाच्या मार्गाला मंजुरी मिळून काही वर्षे उलटूनही सावरगांव सीमेपर्यंतचा रस्ता व पुलाचे काम कधी पूर्ण होणार? असा संतप्त सवाल रखडलेल्या रस्त्यावरून गेल्या दोन वर्षांपासून खापरदरी वासियांना पडत आहे.

 खापरदरी ते सावरगांव कान्होबा या गावातील अंतर साधारण पाच किमी असून सावरगांव कान्होबा पासून खापरदरी सीमेपर्यंतच्या रस्त्यावरील पूल व डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, खापरदरी हद्दीतील सुमारे दोन ते  अडीच किमीचा टप्पा आजही खडी, दगड-गोट्यांनी भरलेला असून या ठिकाणी मोठा नाला असूनही पूल बांधण्यात आलेला नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था ही बांधकाम विभागाच्या कारभाराची पोलखोल करीत आहे.

तालुक्यातील अनेक वृत्तपत्रांनी उपरोक्त रस्ता निर्मिती संदर्भात सातत्याने आवाज उठविल्याने तत्कालीन आमदारांनी प्राधान्याने या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला होता. कामही सुरू झाले, परंतु सावरगांव बाजूचे काम पूर्ण करून ठेकेदाराने खापरदरी बाजूचे काम अर्धवट सोडले आहे.

दोन वर्षांपूर्वी मानोरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केल्याचा केवळ फार्स केला होता. पाहणी करून प्रत्यक्षात पुढे काहीच झाले नाही.

या रस्त्याअभावी खापरदरी,  खापरदरी तांडा, सावरगांव येथील शेतकरी, विद्यार्थी व भाविकांना बाराही महिने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.  चिखल-पाण्यातून शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना व तीर्थक्षेत्र सावरगांव कान्होबा येथे जाणाऱ्या भाविकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णवाहिका, शेती मालाची वाहतूक ठप्प होते.

या मंजूर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खापरदरी ग्रामस्थांमधून देण्यात येत आहे.

*खापरदरी सावरगांव कान्होबा रस्ता व पूल आता शासनाकडून पूर्णत्वास नेल्यास आमच्या गावातील शेतकरी व कष्टकरी यांच्या हालअपेष्टांना आळा बसेल असे प्रतिपादन स्थानिक जगदीश शामराव राठोड,(खापरदरी) अजय नामदेव चव्हाण व पर्यावरण स्नेही जगदीश कमलाबाई धांदू जाधव यांच्या वतीने प्रस्तुत प्रतिनिधीला देण्यात आल्या.*

No comments:

Post a Comment