'सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिवथरघळीत कोमसाप म्हसळा शाखेची वर्षा सहल'.
१० ऑगस्ट २०२६. (वैभव कळस)
२० साहित्यप्रेमी सदस्यांचा सहभाग,ऐतिहासिक,साहित्यिक व निसर्गसंपदेची केली पाहणी
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक व आध्यात्मिक शिवथरघळ येथे कोकण मराठी साहित्य परिषद,शाखा म्हसळा यांच्या वतीने वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले.शाखेचे कार्यतत्पर अध्यक्ष तथा वसंतराव नाईक आणि बॅरिस्टर ए.आर.अंतुले महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.रायप्पा माशाळे यांच्या नेतृत्वाखाली ही वर्षा सहल उत्साहात पार पडली.कोकण मराठी साहित्य परिषद,शाखा म्हसळाच्या वतीने वर्षभर विविध साहित्यिक,सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.याच उपक्रमांच्या मालिकेतील आणखी एक साहित्यिक व सांस्कृतिक अनुभवाचे दुसरे पुष्प म्हणून या वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले.
या सहलीमध्ये शाखेच्या २० सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या शिवथरघळीची सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शिवथरघळीचा ऐतिहासिक वारसा, समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य, ‘सुंदरमठ’ म्हणून असलेले महत्त्व तसेच दासबोधाच्या निर्मितीशी जोडलेला साहित्यिक संदर्भ याबाबत सदस्यांनी माहिती जाणून घेतली.पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, डोंगर-दऱ्या,वाहणारे झरे आणि शिवथरघळीचे निसर्गरम्य वातावरण याचा साहित्यप्रेमींनी मनमुराद आनंद घेतला.
ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या या स्थळाची पाहणी करताना सदस्यांनी विविध माहितीचे संकलन करून आपल्या साहित्यिक दृष्टिकोनातून या परिसराचा अनुभव घेतला.साहित्य परिषद ही केवळ साहित्यिक कार्यक्रमांपुरती मर्यादित न राहता इतिहास,संस्कृती,निसर्ग आणि पर्यटनस्थळांचा अभ्यास करून त्यातून साहित्यिक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.वर्षा सहलीच्या माध्यमातून साहित्यप्रेमी सदस्यांना एकत्र येत अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली.सहलीमुळे सदस्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सह्याद्रीच्या सान्निध्यात इतिहास आणि साहित्याचा अनुभव घेत कोमसाप म्हसळा शाखेच्या वर्षा सहलीचे एक संस्मरणीय पर्व पूर्ण झाले.साहित्य,इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम घडवून आणणारी ही वर्षा सहल सदस्यांच्या कायम स्मरणात राहील असा सूर सहभागी साहित्यप्रेमींमधून अध्यक्ष रायप्पा माशाळे,केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,उपाध्यक्षा अपर्णा ओक,कोमसाप सचिव कीर्तीमाला विचारे,कोषाध्यक्ष सुनील उमरोटकर,जेष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष ओक,रमेश पोटले,सदस्या प्रा.सुरेखा खेडेकर,नगरसेविका जयश्री कापरे,मीनल ढवळे,महेंद्र ढवळे,प्रा.वैशाली माशाळे,प्रणिता गावित मॅडम,अतिक्षा काते,श्री व श्रीमती साधना सुभाष कव्हर,स्नेहा उमरोटकर,विभा खांबेटे,अंकिता काते यांनी व्यक्त केला.
.jpg)
No comments:
Post a Comment