डहाणू — पोलिसांनकडुन आदिवासींवर मारहाण; पोलीस अधिक्षकांनकडे भाकपची कारवाईची मागणी




दर्पण जिल्हा प्रतिनिधी संतोष ठाकरे

*कासा पोलीस ठाण्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष काढणार "जबाबदो मोर्चा*

डहाणू तालुक्यातील वरोती गावात खासगी जमीन मोजणी दरम्यान पोलिसांकडून आदिवासी कुटुंबीयांवर अमानुष व बेकायदेशीर मारहाण केल्याचा संतप्त आरोप समोर आला आहे. घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, ज्यात काही पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक आदिवासींना रस्त्यावर पाडून मारहाण करताना दिसत आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पालघर जिल्हा सेक्रेटरी काॅ. सुनील पाटील यांनी ही घटना निंदनीय असल्याचे ठरवत पालघर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना आज तातडीने निषेध नोंदवत निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी तीन तात्काळ मागण्या मांडल्या आहेत:

- वरोती गावातील घटनेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी;

- दोषी पोलिसांकडून कठोर कारवाई करावी;

- पोलिस दलाकडून सार्वजनिक माफी मागून आदिवासी समाजाचा विस्वास पुनर्स्थापित करावा.

काॅ. सुनील पाटील म्हणाले की, ही घटना फक्त एका कुटुंबावरील अन्याय नसून गरीब व आदिवासी घटकांवर पोलीस दलाकडून सुरू असलेल्या दहशतीचे प्रतिक आहे. त्यांनी चेतावणी दिली की, योग्य ती तातडीची कारवाई झाली नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने कासा पोलीस स्टेशन वर "जबाबदो मोर्चा" काढून जाब विचारले जाईल

याबाबत पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही. स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सध्या घटनास्थळाचा आढावा घेत असल्याचे माहिती मिळते.

No comments:

Post a Comment