जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

बंद लिफ्ट, अस्वच्छ बेडशीटवर नाराजी

 हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शनिवारी (दि. १८ जुलै) कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य सेवांचा सखोल आढावा घेतला. यावेळी त्यांनी अपघात विभाग, प्रसूतीगृह, शस्त्रक्रिया विभाग, जनरल वॉर्डसह विविध विभागांची पाहणी करून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष माहिती घेतली. पाहणीदरम्यान काही रुग्णांच्या बेडवर बेडशीट व्यवस्थित अंथरलेली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त करत रुग्णालयात स्वच्छता, शिस्त आणि रुग्णसेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. सर्व बेडवर स्वच्छ व नीटनेटकी बेडशीट उपलब्ध ठेवण्याच्या तसेच रुग्णसेवेत आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी औषधसाठा, स्वच्छता, कर्मचारी उपस्थिती, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा आणि आरोग्यसेवेच्या गुणवत्तेचीही तपासणी केली. रुग्णांना दर्जेदार, तत्पर व प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीमुळे उपजिल्हा रुग्णालय प्रशासनात काही काळ धावपळ उडाली. विविध विभागांची पाहणी करताना त्यांनी अधिकारी, डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कामकाजासंदर्भात अनेक प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना काही कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी रुग्णालयातील लिफ्ट वापरण्याचा प्रयत्न केला. मात्र, बटण दाबूनही लिफ्ट सुरू झाली नाही. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी लिफ्ट बंद असल्याची माहिती दिली. कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयातील लिफ्ट दीर्घकाळापासून बंद असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली असून, रुग्णांप्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांनाही या समस्येचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यामुळे लिफ्ट तातडीने सुरू करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


No comments:

Post a Comment