दोन किलोमीटर धावत पाठलाग



 लासलगाव पोलिसांनी फरार आरोपीला जेरबंद ; विद्यानगर चोरी प्रकरणातील मुख्य संशयित अटकेत; येवला येथील अन्य चार गंभीर गुन्ह्यांमध्येही होता फरार

प्रतिनिधी  :  गणेश ठाकरे, लासलगाव 

लासलगाव येथील विद्यानगर परिसरातील चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपीला तब्बल दोन किलोमीटर धावत पाठलाग करून लासलगाव पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांना पाहताच पळ काढणाऱ्या आरोपीचा पाठलाग करत त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. भाऊराव रघुनाथ पवार (रा. सावरगाव, ता. येवला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

     याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी लासलगाव येथील विद्यानगर परिसरात चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.

      या प्रकरणातील एक आरोपी यापूर्वीच पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचा साथीदार भाऊराव पवार हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तसेच येवला शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी चार गंभीर गुन्ह्यांमध्येही तो पोलिसांना दीर्घकाळ गुंगारा देत होता. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना आरोपीच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने विशेष पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली. आरोपीच्या मूळ गावी सावरगाव येथे पोलीस पथक पोहोचताच पोलिसांची गाडी पाहून आरोपीने पळ काढला. मात्र पोलिसांनी तब्बल दोन किलोमीटर धावत त्याचा पाठलाग करून घेराव घालत त्याला ताब्यात घेत अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, पोलीस अंमलदार अविनाश सांगळे, संदीप डबळे तसेच चालक पोलीस अंमलदार चंदू मांजरे यांनी सहभाग घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या धाडसी कारवाईबद्दल लासलगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment