अनसिंग ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा : यश चव्हाण यांचे निवेदन
नारायण सातव अनसिंग, प्रतिनिधी (ता. ८ )
अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, नेत्र तज्ज्ञ, लॅब असिस्टंट व कक्ष सेवक ही महत्त्वाची पदे दीर्घकाळ रिक्त असल्याने रुग्णसेवा कोलमडली आहे. ही पदे तातडीने भरावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यश सतीश चव्हाण यांनी सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम यांना निवेदन देऊन केली.
अनसिंग हे तालुक्यातील मोठे गाव असून रुग्णालयावर परिसरातील अनेक गावे अवलंबून आहेत. मात्र रिक्त पदांमुळे सामान्य तपासणी, दातांचे-डोळ्यांचे उपचार, रक्त व इतर चाचण्या ठप्प झाल्या आहेत. रुग्णांना खाजगी रुग्णालय किंवा जिल्हा ठिकाणी जावे लागत असून गरीब व दुर्बल घटकांवर आर्थिक भार पडत आहे. शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व लहान मुलांना वेळेवर उपचार न मिळाल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.
“शासन ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवेचा दावा करते, पण अनसिंगसारख्या मोठ्या गावात कर्मचारीच नसणे चिंताजनक आहे. मूलभूत आरोग्यसेवा हा नागरिकांचा अधिकार आहे. रिक्त पदे तातडीने भरून सेवा सक्षम करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू,” असा इशारा यश चव्हाण यांनी दिला.

No comments:
Post a Comment