बीड बायपास वर हायकोर्ट वकिलाची निर्घृण हत्या; लूटमारीचा संशय .
दैनिक दर्पन वृत सेवा. प्रति. पांडुरंग गायकवाड.
छत्रपती संभाजीनगर - शहरातील बीड बायपास रोडवरील गांधेली फाट्याजवळ एका हायकोर्टातील वकिलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मिथुन भास्कर (४९, रा. आनंदनगर, बीड बायपास) असे मयत वकिलाचे नाव असून लूटमारीच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बुधवारी (१५ एप्रिल) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहायक निरीक्षक भारत पाचोळे आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता संबंधित व्यक्तीच्या मांडीच्या भागातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. प्राथमिक तपासात त्यांच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, घटनास्थळाची पाहणी एसीपी भागीरथी पवार आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी केली. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते.
झुडपात रक्ताचे ठसे, हल्ल्यानंतर पळण्याचा प्रयत्न?
मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला असून जवळच त्यांची दुचाकी उभी होती. घटनास्थळापासून सुमारे १५० मीटर अंतरावरील झुडपातही रक्ताचे डाग आढळले आहेत. तसेच या मार्गावर रक्ताचे चिन्ह आढळल्याने हल्ल्यानंतर त्यांनी बचावासाठी मुख्य रस्त्याकडे धाव घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

No comments:
Post a Comment