'चिचोंडे आदिवासीवाडीत लोकसहभागातून वनराई बंधारा; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार'



 (वैभव कळस )

 पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग उन्हाळ्यात शेती व पशुपालनासाठी व्हावा, तसेच भूजलपातळीत वाढ होऊन पाणीटंचाईवर मात करता यावी, या उद्देशाने म्हसळा तालुक्यातील चिचोंडे आदिवासीवाडीत लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. ग्रामस्थांनी एकत्र येत राबविलेल्या या उपक्रमामुळे जलसंधारणाचा आदर्श निर्माण झाला आहे.

चिचोंडे येथील आदिवासी ग्रामस्थांच्या सहभागातून २५ ऑक्टोबर २०२६ रोजी हा वनराई बंधारा बांधण्यात आला. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, पाण्याची उपलब्धता वाढविणे आणि परिसरातील शेतीला पूरक जलस्रोत निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्याचा उपयोग ६ तसेच शेतीच्या गरजांसाठी होण्यास मदत होणार आहे.

वनराई बंधाऱ्यामुळे पाणी अडवून जमिनीत मुरविण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते. परिणामी भूजलपातळी वाढण्यास मदत होते. विशेषतः आदिवासी वाड्यांमध्ये उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई कमी करण्यासाठी अशा छोट्या जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व मोठे आहे. ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेला हा प्रयत्न भविष्यात इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.

या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जलसंधारणाची कामे केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न ठेवता लोकसहभागातून राबविल्यास ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्यास निश्चितच हातभार लागू शकतो, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.

लोकसहभागातून जलसंधारण, पाणी बचत आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा चियोडे येथील वनराई बंधारा हा ग्रामीण भागातील सामूहिक प्रयत्नांचे उत्तम उदाहरण ठरत आहे.चिंचोडे आदिवासी वाडी गावअध्यक्ष शशिकांत पवार यांच्या पुढाकारातून बांधलेल्या या वनराई बंधाऱ्या प्रसंगी वनरक्षक अतुल अहिरे, ग्रामपंचायत शिपाई वाजे, कृषी सेवक सानप ग्रामस्थ, महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment