फायनान्स कंपन्यांच्या मनमानीला पोलिसांचे पाठबळ?
चिपळूण पोलीस ठाण्यासमोर २९ ऑक्टोबरला महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे धरणे आंदोलन.
चिपळूण: फायनान्स कंपन्यांकडून वाहने बेकायदेशीरपणे ओढून (जप्त करून) री-पझेशन करण्याच्या मनमानी कारभाराला उघडपणे पाठीशी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात महाराष्ट्र लोकाधिकार समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आणि संबंधित प्रवृत्तींचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी येत्या २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यासमोर तीव्र धरणे निदर्शने आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा समितीचे रत्नागिरी जिल्हा विभागीय संघटक अनिकेत शेखर साळवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या आंदोलनाबाबत चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, रत्नागिरी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने रीतसर लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.
या आंदोलनामागील मुख्य प्रकरणाची पार्श्वभूमी मांडताना अनिकेत साळवी यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या ताब्यातील ‘MH09 AG 9997’ या क्रमांकाचा ट्रक चोरीला गेल्याची सविस्तर तक्रार त्यांनी २० जून २०२६ रोजी अर्ज दाखल करून चिपळूण पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, या गंभीर अर्जाच्या चौकशीदरम्यान चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत सकपाळ (ब. क्र. १२२२) हे फायनान्स कंपन्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालत असल्याचे आणि त्यांच्या गैरकृत्यांना सहकार्य करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अशी माहिती अनिकेत साळवी यांनी दिली. नियमांची पायमल्ली करून वाहने ओढणाऱ्या फायनान्स कंपन्या आणि त्यांना अभय देणारे पोलीस कर्मचारी यांचे संगनमत शासन, प्रशासन आणि समाजाच्या पटलावर उघडे पाडण्यासाठी हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले असून, या आंदोलनात महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे अनिकेत साळवी यांनी जाहीर केले आहे.

No comments:
Post a Comment