
मानोरी खुर्द केंद्रावर टोमॅटो व भाजीपाला खरेदी-विक्रीस सुरूवात.
प्रतिनिधी गणेश ठाकरे लासलगाव
दि. १५ :- भरवस फाटा - मानोरी खुर्द रोडलगत नव्याने उभारण्यात आलेल्या १०० मे. टन क्षमतेच्या न्यु माऊली इलेक्ट्रॉनिक डिजीटल वे-ब्रीजचे उद्घाटन तसेच लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मानोरी खुर्द केंद्रावर टोमॅटो व भाजीपाला खरेदी-विक्रीचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर उत्साहात संपन्न झाला.
मुंबई बाजार समितीचे मा. संचालक जयदत्त होळकर, लासलगांव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, उपसभापती संदीप (ललित) दरेकर व सदस्या सौ. सुवर्णाताई जगताप यांच्या शुभहस्ते वे-ब्रीजचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वे-ब्रीज कॅबीन व मशिनरीचे विधीवत पुजन शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
मरळगोई बु. येथील प्रगतीशील शेतकरी व उद्योजक श्री. शिवाजी किसन जगताप यांचे मालकी व कब्जे वहीवाटीची भरवस फाटा - मानोरी खुर्द रोडलगत असलेली जागा लासलगांव बाजार समितीने मानोरी खुर्द खरेदी-विक्री केंद्रासाठी भाडेतत्वावर घेतलेली असुन सदर जागेलगत उभारण्यात आलेल्या या १०० मे. टन क्षमतेच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक डिजीटल वे-ब्रीजमुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी तसेच विविध व्यावसायिकांना शेतीमाल व अन्य मालाचे जलद, अचुक व पारदर्शक वजनमापन करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
अचूक वजनमापनामुळे शेतकरी-व्यापाऱ्यांना मोठा दिलासा
शेतीमालाच्या खरेदी-विक्री व्यवहारात वजन हा अत्यंत महत्वाचा घटक असुन, पारंपारिक वजनपद्धतीच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक डिजीटल वे-ब्रीजमुळे वाहनासह मालाचे वजन अचूकपणे नोंदविता येते. वजनाची डिजीटल नोंद उपलब्ध होत असल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यातील व्यवहार अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.
मानोरी खुर्द खरेदी-विक्री केंद्रावर विक्रीस येणाऱ्या शेतीमालासह परिसरातील शेतकरी बांधवांना आता आपल्या मालाचे अचुक वजन करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली असुन, या सेवेचा परिसरातील शेतकरी, व्यापारी व व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मा. संचालक जयदत्त होळकर यांनी केले.
टोमॅटो व भाजीपाला विक्रीस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
यावेळी मानोरी खुर्द खरेदी-विक्री केंद्रावर परिसरातील शेतकऱ्यांकडून विक्रीस आणण्यात आलेल्या टोमॅटो व विविध भाजीपाल्याच्या खरेदी-विक्री व्यवहाराचा शुभारंभ बाजार समितीचे सदस्य तानाजी आंधळे, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा पाटील सुराशे, वाहेगाव सोसायटीचे सभापती प्रदीप तिपायले व मानोरीचे सरपंच रामदास वावधाने यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
शुभारंभ प्रसंगी श्री. माणिक त्र्यंबक जगताप, रा. मरळगोई बु. यांच्या ०२ क्रेटस् टोमॅटोला रू. २,५०१/- प्रति क्रेटस् असा उच्चांकी दर मिळाला. सदर टोमॅटोची खरेदी शिवशंभु ट्रेडर्सचे चा. दिपक आण्णासाहेब जगताप यांनी केली.
दिवसभरात एकूण १३६ क्रेटस् टोमॅटोची विक्री झाली. त्यास कमीत कमी रू. २५०/-, जास्तीत जास्त रू. २,५०१/- व सर्वसाधारण रू. ८५१/- प्रति क्रेटस् असा दर मिळाला.
याशिवाय २९ बॅग दोडक्याची रू. ४५१/- ते ५०१/- प्रति बॅग, १५ बॅग कारल्याची रू. ३६१/- प्रति बॅग, ०३ बॅग भेंडीची रू. ३,५००/- प्रति क्विंटल, ०५ बॅग वालाची रू. ३,५००/- प्रति क्विंटल तसेच ११ बॅग मिरचीची रू. २,५००/- ते ३,५००/- प्रति क्विंटल दराने विक्री झाली.
वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
शासनाच्या विशेष वृक्षलागवड अभियानांतर्गत मानोरी खुर्द खरेदी-विक्री केंद्रावर बाजार समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत आवारे, लासलगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, कांदा व्यापारी ऋषिकेश ठुबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जागा मालक शिवाजी जगताप, उमेश जगताप, कु. ऐश्वर्या जगताप, सोमनाथ काळे, बाळासाहेब काळे, अरूण चव्हाण, वाळीबा दुगड, सुनील चतुर, धान्य व्यापारी दिपक साबळे, सुभाष शिंदे, ईश्वर शिंदे, किरण चव्हाण, शांताराम हुल्लाळे, रामदास शिंदे, सुरेश मोरे, दिपक नेवगे, दिगंबर गुंजाळ, राहुल शिंदे, टोमॅटो व भाजीपाला व्यापारी दिपक डुंबरे, दिलीप उगलमुगले, तौसिफ बागवान, प्रकाश केंदळे, श्याम जगताप, विजय शेटे तसेच बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, सहाय्यक सचिव सुशिल वाढवणे, सर्व लिलाव प्रमुख काकासाहेब जगताप, डाळींब लिलाव प्रमुख हिरालाल सोनारे, मानोरी खुर्द खरेदी-विक्री केंद्राचे प्रभारी संदीप निकम, गणेश आहेर, शुभम पायमोडे, हर्षवर्धन होनराव, दिपक जेऊघाले, आकाश शिंदे, प्रभाकर घोडे, देवा होळकर, उज्वल जाधव आदींसह परिसरातील शेतकरी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अचूक वजन, पारदर्शक व्यवहार आणि शेतमालाला योग्य बाजारपेठ या उद्देशाने न्यू माऊली इलेक्ट्रॉनिक डिजीटल वे-ब्रीज व मानोरी खुर्द खरेदी-विक्री केंद्राची सुविधा परिसरातील शेतकरी बांधवांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असुन सदरचे केंद्र भुसार व तेलबिया शेतीमालाबरोबर परिसरातील शेतकऱ्यांसाठी टोमॅटो व भाजीपाला विक्रीचे महत्वाचे केंद्र म्हणुन विकसित होईल यात शंका नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला टोमॅटो व भाजीपाला योग्य प्रतवारी, स्वच्छता व दर्जा राखुन बाजार समितीच्या या केंद्रावर विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.
No comments:
Post a Comment