चिंचोर्डी येथे अल्पवयीन मुलीची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलिस ठाण्यासमोर मृतदेहासह ठिय्या



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी जबाबदार संशयितांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका घेत संतप्त नातेवाईकांनी शनिवारी सायंकाळी कळमनुरी पोलिस ठाण्यासमोर मृतदेहासह ठिय्या आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीने १७ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. त्यानंतर १८ एप्रिल रोजी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेताना नातेवाईक आक्रमक झाले. मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी त्यांनी मृतदेहासह थेट कळमनुरी पोलिस ठाणे गाठले. सायंकाळी ६ वाजेपासून पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. नातेवाईक आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर सुमारे तीन तासांनी नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन मागे घेत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेला 

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, आत्महत्येचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे चिंचोर्डी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


No comments:

Post a Comment