नाश, विनाश, विध्वंस आणि आक्रोश: युद्धाचे भयावह वास्तव

 

पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)

आज जग एका अत्यंत भीषण आणि अस्थिर वळणावर उभे आहे. अमेरिका, इराण आणि इजरायल यांच्यातील वाढता संघर्ष केवळ तीन राष्ट्रांपुरता मर्यादित राहिलेला नाही; त्याचे पडसाद संपूर्ण जगभर उमटत आहेत. एकेकाळी राजकीय, आर्थिक किंवा सामरिक कारणांमुळे मित्र असलेली राष्ट्रे आज एकमेकांच्या विनाशासाठी उभी ठाकली आहेत. सत्तेच्या अहंकारातून पेटलेला युद्धाचा वणवा निरपराध मानवतेला होरपळून टाकत आहे. बॉम्ब, मिसाईल आणि बेसुमार मानवी संहाराच्या सावटाखाली माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. संपूर्ण पृथ्वी अस्वस्थ झाली आहे. 

सत्तेचा आणि सामर्थ्याचा हा आंधळा खेळ मानवजातीला एका भीषण दरीत, विनाशाच्या खाईत ढकलून देत आहे.युद्धाचा अर्थ केवळ सीमारेषांवर चालणारी लढाई नसतो; युद्ध म्हणजे माणुसकीचा पराभव. आज आकाशातून कोसळणारे बॉम्ब, धगधगणारी शहरे, कोसळणाऱ्या इमारती,  ढिगाऱ्याखाली दबलेली घरे, रक्ताने माखलेले रस्ते आणि जीवाच्या आकांताने पळणारी निरपराध माणसे. हे दृश्य पाहताना मानवतेची लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिथे कालपर्यंत मुलांच्या हसण्याचे आवाज घुमत होते, तिथे आज स्फोटांचे आवाज आणि आक्रोश ऐकू येत आहेत.

सामान्य नागरिकांनी कोणता अपराध केला आहे? त्यांच्या हातात बंदूक नाही, त्यांच्या मनात सूड नाही. तरीही युद्धाच्या ज्वाळांमध्ये सर्वप्रथम होरपळतात ते निरपराध लोकच. आई-वडील आपल्या मुलांना कवटाळून बंकर्समध्ये लपून बसले आहेत. अनेकांचे संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांचे भविष्य ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे.

युद्धाचा परिणाम फक्त रणांगणावर होत नाही; त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात. इंधनाचे दर आकाशाला भिडतात, महागाई वाढते, अर्थव्यवस्था डळमळते, रोजगाराच्या संधी कमी होतात. व्यापार-उद्योग ठप्प होतात. परदेशात स्थायिक झालेले विस्थापित होतात. होत्याचं नव्हतं झालेलं पाहताना असंख्य डोळ्यांतून अश्रूंचा महापूर पाहून युद्धपिपासु सत्ताधाऱ्यांच्या काळजाला पीळ कसा पडत नाही हेच समजत नाही. युद्धाचे  पर्यावरणावरही गंभीर परिणाम होतात. स्फोट, धूर, रासायनिक प्रदूषण आणि विनाश यामुळे हवा, पाणी आणि जमीन विषारी बनते. पशुपक्षी, वन्यजीव आणि संपूर्ण पर्यावरण या सत्तासंघर्षाचे बळी ठरतात. याहूनही भयानक गोष्ट म्हणजे अण्वस्त्रांचा धोका. जर या संघर्षाने अणुयुद्धाचे रूप घेतले, तर त्याचा परिणाम केवळ एखाद्या देशापुरता मर्यादित राहणार नाही; संपूर्ण मानवजातीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. एका चुकीच्या निर्णयाने पृथ्वीवरील जीवनच संपुष्टात येण्याची भीती नाकारता येत नाही.

इतिहास साक्षी आहे की युद्धातून कधीच शाश्वत शांतता निर्माण झालेली नाही. युद्ध फक्त कधीही भरून न निघणाऱ्या जखमा देतं भूगोलाच्या, अर्थव्यवस्थेच्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी मनाच्या. विजयाचा दावा करणारे राजकारणी कदाचित सत्तेच्या खुर्चीत बसतील; पण रणांगणावर पडलेली प्रेते कोणत्या विजयाची साक्ष देणार?

म्हणूनच आज जगातील सत्ताधाऱ्यांनी आणि राष्ट्रप्रमुखांनी अहंकार, सूड आणि सत्ता यांचा आंधळा  खेळ थांबवणे अत्यावश्यक आहे. संवाद, मुत्सद्देगिरी आणि समजूतदारपणा याच मार्गाने टिकाऊ शांतता प्रस्थापित होऊ शकते. युद्धाचा मार्ग निवडणे सोपे असते; पण शांततेचा मार्ग स्वीकारण्यासाठी मोठेपण आणि दूरदृष्टी लागते.आज जगाला शस्त्रांची नव्हे, तर संवेदनशील नेतृत्वाची गरज आहे. युद्धाची भाषा नव्हे, तर शांततेची भाषा बोलणाऱ्या नेत्यांची गरज आहे. कारण प्रत्येक स्फोटात फक्त इमारती कोसळत नाहीत, तर मानवी संहार, अपरिमित वित्तहानी होते. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील सामान्य माणूस एकच मागणी करत आहे. 

“युद्ध नको… शांतता हवी.”

मानवतेच्या भविष्यासाठी, येणाऱ्या पिढ्यांच्या अस्तित्वासाठी आणि या सुंदर पृथ्वीच्या रक्षणासाठी युद्धाचा मार्ग सोडून शांततेचा मार्ग स्वीकारणे हाच एकमेव पर्याय आहे. कारण शेवटी इतिहास हेच सांगतो.. युद्धाने साम्राज्ये उभी राहू शकतात, पण शांततेनेच मानवता टिकून राहते.प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी (महाड - रायगड)

No comments:

Post a Comment