तिहेरी हत्याकांडाने रांजणगाव हादरले; पोलिसांसमोर मोठं आव्हान, तपासासाठी विशेष पथकांची रचना..!
पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे
शिरूर, रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे घडलेल्या भीषण तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, या गुन्ह्याचा तपास पोलिसांसमोर मोठं आव्हान बनला आहे. पुणे ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा तसेच शिक्रापूर, रांजणगाव व अन्य पोलिस ठाण्यांचे अधिकारी व पथके तपासात गुंतले आहेत.
घटनेचा तपशील
काल दिनांक २५ मे रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास रांजणगाव गणपती येथील ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस एका पंचवीस वर्षाच्या महिलेचा व तिच्या दोन चिमुकल्यांचा (सुमारे ४ वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षाच्या चिमुकल्याचा) मृतदेह आढळून आला. हे तिन्ही मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असून, त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने जबर मारहाण करून हत्या करण्यात आली, असा प्राथमिक अंदाज आहे. हत्येनंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पेटवले असल्याचे समोर आले आहे.
अनोळखी महिलेच्या ओळखीचा सुराग
मयत महिलेच्या उजव्या मनगटावर "Mom Dad" असे इंग्रजीत गोंदलेले असून, त्यापुढे बदाम आकारात R व S अशी अक्षरे आणि "Rajratan" तसेच "जय भीम" असे गोंदण आहे. डाव्या हातावर फुलांची डिझाईन गोंदलेली आहे. या गोंदणाच्या आधारे ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी उपस्थिती
या तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक महादेव वाघमोडे, शिक्रापूर पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड व अन्य अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.तसेच फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांनीही घटनास्थळी तपास केला आहे.
फिर्याद आणि गुन्हा दाखल
या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार गुलाब भिवराज येळे (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास वेगात
सध्या मयत महिला व तिच्या मुलांची ओळख पटविणे आणि आरोपींचा शोध घेणे हे प्राथमिक उद्दिष्ट असून, LCB, शिक्रापूर, रांजणगाव व पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या संयुक्त पथकांनी तपास सुरु केला आहे. विविध दिशांनी तपास केला जात असून, अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही.
पोलीस दल सज्ज – आरोपींना लवकरच गजाआड करण्याचा निर्धार
या खळबळजनक तिहेरी हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. घटनास्थळी संपूर्ण पुरावे गोळा करून फॉरेन्सिक तपासाच्या आधारे गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.--- महादेव वाघमोडे,पोलिस निरीक्षक,रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन
No comments:
Post a Comment